Prof R R Kelkar commented upon the recent Uttarakhand tragedy in the 5 July 2013 issue of the Marathi weekly Lokprabha:

आपल्याकडे एक नेहमीची सवयच झालेली आहे. कोणतीही घटना घडली की त्याची तुलना परदेशातील घटनांशी करायची आणि आपण कसे कमी आहोत, त्यांच्याकडे कसे प्रगत तंत्रज्ञान आहे वगरे चर्चा करायची. हा पायंडाच पडला आहे, पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याकडेदेखील प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याबाबत आपण प्रगत देशांपेक्षा कोठेही कमी नाही, पण आपल्याकडील भौगोलिक परिस्थितीचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हिमालयाची उंची ही जगातील इतर कोणत्याही पर्वतरांगांपेक्षा खूप वेगळी आहे हे ध्यानात घ्यावे लागेल.दुसरे असे की, आपण अनुमान देऊ शकतो; पण ते अनुमान संबंधित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीदेखील हिमालयाची भौगोलिक रचना मोठा अडथळा ठरते. तसेच तेथील लोकसंख्या ही विखुरलेली आहे. या सर्वांपर्यंत शहरासारखे त्वरित संपर्क होणे शक्य नसते.

सर्व डोंगरांवर रडार बसवावा म्हणजे मग काहीच अडचण राहणार नाही, अशी मल्लिनाथीदेखील अनेकांकडून केली जाते. आपल्याकडे रडारचे तंत्रज्ञान चांगल्या आणि मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे, पण रडारसाठी जी लाइन ऑफ साइट हवी असते ती हिमालयात योग्य प्रकारे मिळू शकत नाही. काही क्षणांपूर्वी दिसणारा एखादा ढग क्षणात डोंगराआड जातो, तेव्हा त्याचे ट्रॅकिंग करणे अवघड होते. तंत्रज्ञानाला असलेल्या या मूलभूत मर्यादा आपण दृष्टिआड करून चालणार नाहीत.

हिमालयाच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर एक तास आधी जरी या संकटाची सूचना मिळाली तरी तेथे असणाऱ्या मोठय़ा प्रमाणातील भाविकांना तेथून बाहेर काढणे शक्य झाले नसते. तसेच एखादा ढग केव्हा, कसे, कोठे, किती काळ फुटेल असे अगदी स्पेसिफिक उत्तर देणे शक्य नसते. साधारण कल्पना तुम्हाला मिळू शकते. दुसरे असे की, हिमालयातील वातावरण बऱ्याच वेळा मिनिटामिनिटाला बदलत असते. एखादा ढग येतो आणि पाहता पाहता शिखर पार करून जातो. उपग्रह छायाचित्रदेखील ३० मिनिटांनंतर मिळते. ढगफुटी झाली तरी पुढे तो पाण्याचा लोंढा कोणत्या दिशेने जाणार हे कसे काय सांगणार?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिमालयाबाबत आणि सध्याच्या घटनेच्या अनुषंगाने सांगायचे तर, येथे हवामान अंदाजापेक्षा माणसाला शिस्तीची गरज जास्त असल्याचे दिसून आले आहे.
रंजन केळकर, माजी संचालक, हवामान खाते

Advertisements